प्रथम नमन करूं गणनाथा| उमाशंकराचिया सुता | चरणावरी ठेवूनि माया| साष्टांगी आतां दंडवत ||१||
दुसरी वंदू सारजा| जे चतुराननाची आत्मजा | वा‌कसिद्धि पाविजे सह‌जा तिच्या चरणवोजा दंडवत ||२||
आतां  वंदू  देवब्राह्मण| ज्यांचेनि पुण्यपावन | प्रसन्न होऊनी श्रोतेजन| त्यां माझे नमन दंडवत ||३||
आतां  वंदू साधुसज्जन| रात्रंदिवस हरिचे ध्यान| विठ्ठल नाम उच्चारिती जन| त्यां माझे नमन दंडवत ||४||
मातां नमू रंगभूमिका | कीर्तनी उभे होती लोकां | टाळ मृदुंग श्रोते देखा | त्यां माझे दंडवत ||५||
 ऐसे नमन करोनि सकळा | हरिकथा बोले बोबड्या बोला | अज्ञान म्हणोनि आपल्या बाळा | चालवी सकळां नामा म्हणे || ६ ||