मंगलाचरण–अभंग ६
अभंग क्र. १
समचरणदृष्टि विटेवरी साजिरी | तेथें माझी हरी वृत्ति राहो ||१||
आणीक न लगे मायिक पदार्थ | तेथें माझें आर्त्त नको देवा ||ध्रु.||
ब्रम्हादिक पदें दुःखाची शिराणी | तेथें दुश्चित झणी जडों देसी ||२||
तुका म्हणे त्याचें कळलें आम्हां वर्म | जे जे कर्मधर्म नाशवंत ||३||
अभंग क्र. २
सुंदर तें ध्यान उभे विटेवरी | कर कटावरी ठेवूनियां ||१||
तुळसीचे हार गळां कासे पीतांबर | आवडे निरंतर तें चि रूप ||ध्रु.||
मकरकुंडलें तळपती श्रवणीं | कंठीं कौस्तुभमणि विराजित ||२||
तुका म्हणे माझें हें चि सर्व सुख | पाहीन श्रीमुख आवडीनें ||३||
अभंग क्र. ३
सदा माझे डोळे जडो तुझे मूर्ती | रखुमाईच्या पती सोयरिया ||१||
गोड तुझें रूप गोड तुझें नाम | देईं मज प्रेम सर्व काळ ||ध्रु.||
विठो माउलिये हा चि वर देईं | संचरोनि राहीं हृदयामाजी ||२||
तुका म्हणे कांहीं न मागे आणीक | तुझे पायीं सुख सर्व आहे ||३||
अभंग क्र. ४
राजस सुकुमार मदनाचा पुतळा | रविशशिकळा लोपलिया ||१||
कस्तुरीमळवट चंदनाची उटी | रुळे माळ कंठीं वैजयंती ||ध्रु.||
मुगुट कुंडले श्रीमुख शोभलें | सुखाचें ओतलें सकळ ही ||२||
कासे सोनसळा पांघरे पाटोळा | घननीळ सांवळा बाइयानो ||३||
सकळ ही तुम्ही व्हा गे एकीसवा | तुका म्हणे जीवा धीर नाहीं ||४||
अभंग क्र. ५
कर कटावरी तुळसीच्या माळा | ऐसें रूप डोळां दावीं हरी ||१||
ठेविले चरण दोन्ही विटेवरी | ऐसें रूप हरी दावीं डोळां ||ध्रु.||
कटीं पीतांबर कास मिरवली | दाखवीं वहिली ऐसी मूर्ती ||२||
गरुडपारावरी उभा राहिलासी | आठवें मानसीं तें चि रूप ||३||
झुरोनी पांजरा होऊं पाहें आतां | येईं पंढरीनाथा भेटावया ||४||
तुका म्हणे माझी पुरवावी आस | विनंती उदास करूं नये ||५||
अभंग क्र. ६
गरुडाचें वारिकें कासे पीतांबर | सांवळें मनोहर कैं देखेन ||१||
बरवया बरवंटा घनमेघ सांवळा | वैजयंतीमाळा गळां शोभे ||ध्रु.||
मुगुट माथां कोटि सूर्यांचा झळाळ | कौस्तुभ निर्मळ शोभे कंठीं ||२||
ओतींव श्रीमुख सुखाचें सकळ | वामांगीं वेल्हाळ रखुमादेवी ||३||
उद्धव अक्रूर उभे दोहींकडे | वर्णिती पवाडे सनकादिक ||४||
तुका म्हणे नव्हे आणिकांसारिखा | तो चि माझा सखा पांडुरंग ||५||
विराण्या - अभंग २५
अभंग क्र. ७
वाळो जन मज म्हणोत शिंदळी | परि हा वनमाळी न विसंबें ||१||
सांडूनि लौकिक जालियें उदास | नाहीं भय आस जीवित्वाची ||२||
नाइकें वचन बोलतां या लोकां | म्हणे जालों तुका हरिरता ||३||
अभंग क्र. ८
आधिल्या भ्रतारें काम नव्हे पुरा | म्हणोनि व्यभिचारा टेकलियें ||१||
रात्रंदिस मज पाहिजे जवळी | क्षण त्यानिराळी न गमे घडी ||२||
नाम गोष्टी माझी सोय सांडा आतां | रातलें अनंता तुका म्हणे ||३||
अभंग क्र. ९
हाचि नेम आतां न फिरें माघारी | बैसलें शेजारीं गोविंदाचे ||१||
घररिघी जालें पट्टराणी बळें | वरिलें सांवळें परब्रम्ह ||२||
बळियाचा अंगसंग जाला आतां | नाहीं भय चिंता तुका म्हणे ||३||
अभंग क्र. १०
नाहीं काम माझें काज तुम्हांसवें | होतें गुप्त ठावें केलें आतां ||१||
व्यभिचार माझा पडिला ठाउका | न सर ती लोकांमाजी जालें ||२||
न धरावा लोभ कांहीं मजविशीं | जालें देवपिशी तुका म्हणे ||३||
अभंग क्र. ११
विसरले कुळ आपुला आचार | पती भावे दीर घर सोय ||१||
सांडिला लौकिक लाज भय चिंता | रातलें अनंता चित्त माझें ||२||
मज आतां कोणी आळवाल झणी | तुका म्हणे कानीं बहिरी जालें ||३||
अभंग क्र. १२
न देखें न बोलें नाइकें आणीक | बैसला हा एक हरि चित्तीं ||१||
सासुरें माहेर मज नाहीं कोणी | एक केलें दोन्ही मिळोनियां ||२||
आळ आला होता आम्ही भांडखोरी | तुका म्हणे खरी केली मात ||३||
अभंग क्र. १३
दुजा ऐंसा कोण बळी आहे आतां | हरि या अनंता पासूनिया ||१||
बळियाच्या आम्ही जालों बळिवंता | करूं सर्व सत्ता सर्वांवरी ||२||
तुका म्हणे आम्ही जिवाच्या उदारा | जालों प्रीतिकरा गोविंदासी ||३||
अभंग क्र. १४
क्षणभरी आम्ही सोसिलें वाईट | साधिलें अवीट निजसुख ||१||
सांडी मांडी मागें केल्या भरोवरी | अधिक चि परी दुःखाचिया ||२||
तुका म्हणे येणें जाणें नाहीं आतां | राहिलों अनंताचिये पायीं ||३||
अभंग क्र. १५
आम्हां आम्ही आतां वडील धाकुटीं | नाहीं पाठीं पोटीं कोणी दुजें ||१||
फावला एकांत एकविध भाव | हरि आम्हांसवें सर्व भोगी ||२||
तुका म्हणे अंगसंग एके ठायीं | असों जेथें नाहीं दुजें कोणी ||३||
अभंग क्र. १६
सर्व सुख आम्ही भोगूं सर्व काळ | तोडियेलें जाळ मोहपाश ||१||
याचसाठी सांडियेले भरतार | रातलों या परपुरुषाशीं ||२||
तुका म्हणे आतां गर्भ नये धरूं | औषध जें करूं फळ नव्हे ||३||
अभंग क्र. १७
एका जिवें आतां जिणें जालें दोहीं | वेगळीक कांहीं नव्हे आतां ||१||
नारायणा आम्हां नाहीं वेगळीक | पुरविली हे भाक सांभाळिली ||२||
तुका म्हणे जालें सायासाचें फळ | सरली ते वेळ काळ दोन्ही ||३||
अभंग क्र. १८
हासों रुसों आतां वाढवूं आवडी | अंतरींची गोडी अवीट ते ||१||
सेवासुखें करूं विनोदवचन | आम्ही नारायण एकाएकीं ||२||
तुका म्हणे आम्ही जालों उदासीन | आपुल्या आधीन केला पति ||३||
अभंग क्र. १९
मजसवें आतां येऊं नका कोणी | सासुरवासिनी बाइयानो ||१||
न साहवे तुम्हां या जनाची कूट | बोलती वाईट ओखटें तें ||२||
तुका म्हणे जालों उदास मोकळ्या | विचरों गोवळ्यासवें आम्ही ||३||
अभंग क्र. २०
शिकविलें तुम्हीं तें राहे तोंवरी | मज आणि हरी वियोग तों ||१||
प्रसंगीं या नाहीं देहाची भावना | तेथें या वचना कोण मानी ||२||
तुका म्हणे चित्तीं बैसला अनंत | दिसों नेदी नित्य अनित्य तें ||३||
अभंग क्र. २१
सांगतों तें तुम्हीं अइकावें कानीं | आमुचे नाचणीं नाचूं नका ||१||
जोंवरी या तुम्हां मागिलांची आस | तोंवरी उदास होऊं नका ||२||
तुका म्हणे काय वांयांविण धिंद | पति ना गोविंद दोन्ही नाहीं ||३||
अभंग क्र. २२
आजिवरी तुम्हां आम्हां नेणपण | कौतुकें खेळणें संग होता ||१||
आतां अनावर जालें अगुणाची | करूं नये तें चि करीं सुखें ||२||
तुका म्हणे आतां बुडविलीं दोन्ही | कुळें एक मनीं नारायण ||३||
अभंग क्र. २३
सासुरियां वीट आला भरतारा | इकडे माहेरा स्वभावें चि ||१||
सांडवर कोणी न धरिती हातीं | प्रारब्धाची गति भोगूं आतां ||२||
न व्हावी ते जाली आमुची भंडाई | तुका म्हणे काई लाजों आतां ||३||
अभंग क्र. २४
मरणाही आधीं राहिलों मरोनी | मग केलें मनीं होतें तैसें ||१||
आतां तुम्ही पाहा आमुचें नवल | नका वेचूं बोल वांयांविण ||२||
तुका म्हणे तुम्ही भयाभीत नारी | कैसे संग सरी तुम्हां आम्हां ||३||
अभंग क्र. २५
परपुरुषाचें सुख भोगे तरी | उतरोनि करीं घ्यावें सीस ||१||
संवसारा आगी आपुलेनि हातें | लावूनि मागुतें पाहूं नये ||२||
तुका म्हणे व्हावें तयापरी धीट | पतंग हा नीट दीपासोई ||३||
अभंग क्र. २६
अइकाल परी ऐसें नव्हे बाई | न संडा या सोई भ्रताराची ||१||
नव्हे आराणुक लौकिकापासून | आपुल्या आपण गोविलें तें ||२||
तुका म्हणे मन कराल कठीण | त्या या निवडोन मजपाशीं ||३||
अभंग क्र. २७
आहांच वाहांच आंत वरी दोन्ही | न लगा गडणी आम्हां तैशा ||१||
भेऊं नये तेथें भेडसावूं कोणा | आवरूनि मना बंद द्यावा ||२||
तुका म्हणे कांहीं अभ्यासावांचुनी | नव्हे हे करणी भलतीची ||३||
अभंग क्र. २८
बहुतांच्या आम्ही न मिळो मतासी | कोणी कैसी कैसी भावनेच्या ||१||
विचार करितां वांयां जाय काळ | लटिकें तें मूळ फजितीचें ||२||
तुका म्हणे तुम्ही करा घटापटा | नका जाऊं वाटा आमुचिया ||३||
अभंग क्र. २९
त्याचें सुख नाहीं आलें अनुभवा | कठिण हें जिवा तोंचिवरी ||१||
मागिलांचे दुःख लागों नेदी अंगा | अंतर हें संगा नेदी पुढें ||२||
तुका म्हणे सर्वविशीं हा संपन्न | जाणती महिमान श्रुति ऐसें ||३||
अभंग क्र. ३०
न राहे रसना बोलतां आवडी | पायीं दिली बुडी माझ्या मनें ||१||
मानेल त्या तुम्ही अइका स्वभावें | मी तों माझ्याभावें अनुसरलें ||२||
तुका म्हणे तुम्हीं फिरावें बहुतीं | माझी तों हे गती जाली आतां ||३||
अभंग क्र. ३१
न बोलतां तुम्हां कळों न ये गुज | म्हणउनी लाज सांडियेली ||१||
आतां तुम्हां पुढें जोडीतसें हात | नका कोणी अंत पाहों माझा ||२||
तुका म्हणे आम्ही बैसलों शेजारीं | करील तें हरी पाहों आतां ||३||
||२५||
अभंग क्र. ३२
नये जरी तुज मधुर उत्तर | दिधला सुस्वर नाहीं देवें ||१||
नाहीं तयाविण भुकेला विठ्ठल | येइल तैसा बोल रामकृष्ण ||ध्रु.||
देवापाशीं मागें आवडीची भक्ति | विश्वासेंशीं प्रीति भावबळें ||२||
तुका म्हणे मना सांगतों विचार | धरावा निर्धार दिसेंदिस ||३||
अभंग क्र. ३३
सावध जालों सावध जालों | हरिच्या आलों जागरणा ||१||
तेथें वैष्णवांचे भार | जयजयकार गर्जतसे ||ध्रु.||
पळोनियां गेली झोप | होतें पाप आड तें ||२||
तुका म्हणे त्या ठाया | ओल छाया कृपेची ||३||
अभंग क्र. ३४
आपुलिया हिता जो असे जागता | धन्य माता पिता तयाचिया ||१||
कुळीं कन्यापुत्र होतीं जीं सात्त्विक | तयाचा हरिख वाटे देवा ||ध्रु.||
गीता भागवत करिती श्रवण | आणीक चिंतन विठोबाचें ||२||
तुका म्हणे मज घडो त्याची सेवा | तरी माझ्या दैवा पार नाहीं ||३||
अभंग क्र. ३५
अंतरींची घेतो गोडी | पाहे जोडी भावाची ||१||
देव सोयरा देव सोयरा | देव सोयरा दीनाचा ||ध्रु.||
आपुल्या वैभवें | शृंगारावें निर्मळ ||२||
तुका म्हणे जेवी सवें | प्रेम द्यावें प्रीतीचें ||३||
अभंग क्र. ३६
सुखें वोळंब दावी गोहा | माझें दुःख नेणा पाहा ||१||
आवडीचा मारिला वेडा | होय होय कैसा म्हणे भिडा ||ध्रु.||
निपट मज न चले अन्न | पायली गहूं सांजा तीन ||२||
गेले वारीं तुम्हीं आणिली साकर | सातदी गेली साडेदहा शेर ||३||
अखंड मज पोटाची व्यथा | दुधभात साकर तूप पथ्या ||४||
दो पाहरा मज लहरी येती | शुद्ध नाहीं पडे सुपती ||५||
नीज नये घाली फुलें | जवळीं न साहती मुलें ||६||
अंगी चंदन लावितें भाळीं | सदा शूळ माझे कपाळीं ||७||
हाड गळोनि आलें मास | माझें दुःख तुम्हां नेणवे कैसें ||८||
तुका म्हणे जिता गाढव केला | मेलियावरि नरका नेला ||९||
अभंग क्र. ३७
पावलें पावलें तुझें आम्हां सर्व | दुजा नको भाव होऊं देऊं ||१||
जेथें तेथें तुझीं च पाउलें | त्रिभुवन संचलें विठ्ठला गा ||ध्रु.||
भेदाभेदमतें भ्रमाचे संवाद | आम्हां नको वाद त्यांशीं देऊं ||२||
तुका म्हणे अणु तुजविण नाहीं | नभाहूनि पाहीं वाढ आहे ||३||
अभंग क्र. ३८
वंदूं चरणरज सेवूं उष्टावळी | पूर्वकर्मा होळी करुनी सांडूं ||१||
अमुप हे गांठीं बांधूं भांडवल | अनाथा विठ्ठल आम्हां जोगा ||ध्रु.||
अवघे होती लाभ एका या चिंतनें | नामसंकीर्तनें गोविंदाच्या ||२||
जन्ममरणाच्या खुंटतील खेपा | होईल हा सोपा सिद्ध पंथ ||३||
गेले पुढें त्यांचा शोधीत मारग | चला जाऊं माग घेत आम्ही ||४||
तुका म्हणे घालूं जीवपणा चिरा | जाऊं त्या माहेरा निजाचिया ||५||
अभंग क्र. ३९
जेविले ते संत मागें उष्टावळी | अवघ्या पत्रावळी करुनी झाडा ||१||
सोवळ्या ओंवळ्या राहिलों निराळा | पासूनि सकळां अवघ्यां दुरीं ||ध्रु.||
परें परतें मज न लागे सांगावें | हें तों देवें बरें शिकविलें ||२||
दुसर्यातें आम्ही नाहीं आतळत | जाणोनि संकेत उभा असे ||३||
येथें कोणीं कांहीं न धरावी शंका | मज चाड एका भोजनाची ||४||
लांचावला तुका मारितसे झड | पुरविलें कोड नारायणें ||५||
अभंग क्र. ४०
देवाच्या प्रसादें करा रे भोजन | व्हाल कोण कोण अधिकारी ते ||१||
ब्रम्हादिकांसि हें दुर्लभ उच्छिष्ट | नका मानूं वीट ब्रम्हरसीं ||ध्रु.||
अवघियां पुरतें वोसंडलें पात्र | अधिकार सर्वत्र आहे येथें ||२||
इच्छादानी येथें वळला समर्थ | अवघें चि आर्त पुरवितो ||३||
सरे येथें ऐसें नाहीं कदाकाळीं | पुढती वाटे कवळीं घ्यावें ऐसें ||४||
तुका म्हणे पाक लक्षुमीच्या हातें | कामारीसांगातें निरुपम ||५||
अभंग क्र. ४१
अवगुणांचे हातीं | आहे अवघी फजीती ||१||
नाहीं पात्रासवें चाड | प्रमाण तें फिकें गोड ||ध्रु.||
विष तांब्या वाटी | भरली लावूं नये होटीं ||२||
तुका म्हणे भाव | शुद्ध बरा सोंग वाव ||३||
अभंग क्र. ४२
हरीच्या जागरणा | जातां कां रे नये मना ||१||
कोठें पाहासील तुटी | आयुष्य वेचे फुकासाटीं ||२||
ज्यांची तुज गुंती | ते तों मोकलिती अंतीं ||२||
तुका म्हणे बरा | लाभ काय तो विचारा ||३||
अभंग क्र. ४३
धर्माची तूं मूर्ती | पाप पुण्य तुझे हातीं ||१||
मज सोडवीं दातारा | कर्मापासूनि दुस्तरा ||ध्रु.||
करिसी अंगीकार | तरी काय माझा भार ||२||
जिवींच्या जीवना | तुका म्हणे नारायणा ||३||
अभंग क्र. ४४
ब्रम्हादिक जया लाभासि ठेंगणे | बळिये आम्ही भले शरणागत ||१||
कामनेच्या त्यागें भजनाचा लाभ | जाला पद्मनाभ सेवाॠणी ||ध्रु.||
कामधेनूचिया क्षीरा पार नाहीं | इच्छेचिये वाही वरुषावे ||२||
बैसलिये ठायीं लागलें भरतें | त्रिपुटीवरतें भेदी ऐसें ||३||
हरि नाहीं आम्हां विष्णुदासां जगीं | नारायण अंगीं विसावला ||४||
तुका म्हणे बहु लाटे हें भोजन | नाहीं रिता कोण राहत राहों ||५||
अभंग क्र. ४५
दुजें खंडे तरी | उरला तो अवघा हरि || आपणाबाहेरी | न लगे ठाव धुंडावा ||१||
इतुलें जाणावया जाणा | कोंडें तरी मनें मना || पारधीच्या खुणा | जाणतें चि साधावे ||ध्रु.||
देह आधीं काय खरा | देहसंबंधपसारा || बुजगावणें चोरा | रक्षणसें भासतें ||२||
तुका करी जागा | नको चाचपूं वाउगा || आहेसि तूं आगा | अंगीं डोळे उघडी ||३||
अभंग क्र. ४६
विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म | भेदाभेदभ्रम अमंगळ ||१||
अइका जी तुम्ही भक्त भागवत | कराल तें हित सत्य करा ||ध्रु.||
कोणा ही जिवाचा न घडो मत्सर | वर्म सर्वेश्वरपूजनाचें ||२||
तुका म्हणे एका देहाचे अवयव | सुख दुःख जीव भोग पावे ||३||
अभंग क्र. ४७
आम्ही जरी आस | जालों टाकोनि उदास ||१||
आतां कोण भय धरी | पुढें मरणाचें हरी ||ध्रु.||
भलते ठायीं पडों | देह तुरंगीं हा चढो ||२||
तुमचें तुम्हांपासीं | आम्ही आहों जैसीं तैसीं ||३||
गेले मानामान | सुखदुःखाचें खंडन ||४||
तुका म्हणे चित्तीं | नाहीं वागवीत खंती ||५||
अभंग क्र. ४८
निंदी कोणी मारी | वंदी कोणी पूजा करी ||१||
मज हें ही नाहीं तें ही नाहीं | वेगळा दोहीं पासुनी ||ध्रु.||
देहभोग भोगें घडे | जें जें जोडे तें बरें ||२||
अवघें पावे नारायणीं | जनार्दनीं तुक्याचें ||३||
अभंग क्र. ४९
जन विजन जालें आम्हां | विठ्ठलनामा प्रमाणें ||१||
पाहें तिकडे बापमाय | विठ्ठल आहे रखुमाई ||ध्रु.||
वन पट्टण एकभाव | अवघा ठाव सरता जाला ||२||
आठव नाहीं सुखदुःखा | नाचे तुका कौतुकें ||३||
अभंग क्र. ५०
हिरा ठेवितां ऐरणीं | वांचे मारितां जो घणीं ||१||
तोचि मोल पावे खरा | करणीचा होय चुरा ||ध्रु.||
मोहरा होय तोचि अंगें | सूत न जळे ज्याचे संगें ||२||
तुका म्हणे तोचि संत | सोसी जगाचे आघात ||३||
अभंग क्र. ५१
आलिंगनें घडे | मोक्ष सायुज्यता जोडे ||१||
ऐसा संताचा महिमा | जाली बोलायाची सीमा ||ध्रु.||